पर्जन्य(मान कमाल आणि किमान)



पर्जन्य म्हणण्यापेक्षा पाऊस...एवढा परका वाटू लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. वयाच्या प्रत्येक टप्यावर त्याचं असणं किती निराळं भासत आलय आजवर.....

            बालपणीच्या कोवळ्या वयात तो एका अल्लड सवंगड्यासारखा भेटायचा. ज्याच्या सोबत तासन् तास खेळावे असा. तो आला की आम्हा दोघांची हुंदडायची तयारी व्हायची. मनसोक्त भिजल्यावर कोरडी होऊन जेव्हा मी चादरीत घुसायचे तेव्हा ही दारावर धो धो आपटून मला हाका द्यायचा. अगदी रात्रभर.....


शाळेतला पाऊस म्हणजे नव्या दप्तराची, नव्या वह्या-पुस्तकांची, नव्या छत्रीची….एका नव्या शालेय वर्षाची चाहूल घेऊन येणारा पाऊस. शाळेला दांडी मारून किंवा कधी अनायासे सुट्टी मिळून दिवसभर छान कागदाच्या होड्या बनवयचो आम्ही. आजही पाऊस आला की शालेय जीवनातले अनेक प्रसंग तरंगत राहतात मनात कित्येकदा...


त्यानंतरचा पाऊस गुलाबी...एखाद्या ‍प्रियकरासारखा...चिडवणारा….सतावणारा…..रात्रीच्या एकांत क्षणी सगळे झोपलेले असताना अचानक येऊन भेटणारात्याच्या आगमनाची आस लाऊन बसलेली मी, त्याच्या येण्याने मोहरुन जायचे. मग चहाच्या कपांतून निघणार्‍या वाफांत बर्याच भेटी व्हायच्या आमच्या. धुंदलेले क्षण शहारुन टाकणारे त्याचे येणे आठवले की एका रितेपणाची भावना भरून टाकते मनाला. नव्या नव्या नात्याचे ताजे ताजे स्पर्श जागवणारा तो पाऊस. त्या क्षणाची आठवण प्रखर करणारा.पाऊले नेतील तेथे जायचो आम्ही. संगतीची नशा वाढवणारा पाऊस डोक्यावर घेऊन. काय कमालीचा बरसायचा तो.


आता मात्र किमानच येतो. फक्त येतो नि जातो. ते हुंदडने, मोहरनेशहारने...सगळे सगळे विसरलाय...का बरं रुसलाय कुणास ठाऊक. जलाशयातील पाण्याचा साठा भरून काढण्यास येतो म्हणे....त्याचे येणे आता तेवढ्यापुरतेच राहिले आहे. त्याच्यासाठीही आणि माझ्यासाठीही.....!!!

   





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्मृती

रेतकण

वादळांत