Tuesday, 9 August 2016

स्मृती


तुला सांगितले का कोणी
आल्या होत्या त्या दाराशी
थेट शिरल्या मनात
आणि डोळ्यांत बसल्या
किस्से पुराने सांगुनी
पोटभरुनी हासल्या
घेऊन त्या आल्या संगे
ती उन्हं नी पावसाळे
जेव्हा उनाड होते वय
आणि मन हे बेभान
खूप बोलल्या माझ्याशी
मज रडवूनी गेल्या
तुझ्या स्पर्शाची तहान
मनी जागवूनी गेल्या!!!Tuesday, 12 July 2016

रेतकण
एकेका रेतकणाचे निसटणे
डोळ्यांत सामावलेले

त्या वाटेवरी क्षणाक्षणाचे
अस्तित्व रेंगाळलेले

डळमळत्या नजरेला
मनाचे ते समजावणे

तेच थार्यावर नाही
रोजचेच हे भरकटणे !!
Sunday, 26 June 2016

तिमिर धनु


         एकांत क्षणी  मनाच्या पटलावर गतकालीन घटनांचे येणे जाणे चालूच असते. आठवणींचे थवेच्या थवे गर्दी करू लागतात. त्यातीलच काही अगदी अखेरच्या श्वासांपर्यंत न पुसलं जाणार आपलं अस्तित्व वारंवार खुणावत असतात. मग मनाचा वारु सुसाट वार्याच्यागतीने पुढे सरकणार्या वेळेच्या विरूद्ध दिशेने धावू लागतो. उगीचच त्या हव्याश्या वाटणार्या घटना पुन्हा अनुभवण्यासाठी त्या गूढ आठवणींच्या धुसर वाटेवरून भरधाव वेगात नुसताच पळत राहतो. सारे लगाम त्या वाटेवरील धुळीत तूटुन पडतात.

         अशातच त्यांतल्याच काही अश्या ज्यांच अस्तित्व जाजतं. ते पुसता आल असत तर किती बरं झालं असतंअशी भावना उफाळून येते. त्यांचे रंग इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे सोज्वळ नसतात. अगदी प्रखर असतात. डोळ्यांत तीव्रतेने घुसणारे भडक रंग.....काळी छाटा असणारे....अशा धनुला काय म्हणावे बरे.... तिमिरधनु’…गेले काही दिवस अंधारलेल्या मनाच्या नभावर थबकले आहे.  

         त्यातल्या रंगांची शहानिशा करायला लागताच मन नानाप्रकारचे प्रश्न विचारायला सुरूवात करते. का वागली मी अशी त्यावेळी?’  मग मन स्वताचीच समजूत घालण्यास सज्ज होते. परिस्थितीच्या माथ्यावर दोष मढवू पाहाते. पण मनाच्या या डावांत अडकून पडणे निरर्थकच नाही का? त्या रंगाना जशेच्या तसे स्वीकारून त्यातून बाहेर पडणे कधीही चांगले. अन्यथा नको असणार्या आठवणींच अस्तित्व पुसट होण्यापेक्षा अधिकच ठाम होत जातं. म्हणूनच द्वेष,क्रोध,मत्सराचे हे रंग मुठीत बांधुन ठेवू नयेत तर उधळून लावावेत. Life becomes easier when you let go!!

नको थबकू तिमिरांच्या गावी
गाव तो फार ऊजाड
तिमिर धनुत न्हालेले
जन ते फार अनाड

का लेवावे काळ्या क्रोधा
नेई अंधारी जो घनदाट
माणसाला माणूस परका
भूलवून देई जो अनुराग

सोड विचारांची कमान
नकार ज्यांतून सांडे
न दिसे उद्याची प्रभात
नयनी झापड बांधे

ईर्षेचा तर रंगच न्यारा
अनोळखी भासे स्वकाया
अनुताप घेईल भरारी
न राहील उतराया पायरी

ओढून घे प्रीतीचा शेला
निश्चयाचा वारु बांध
कमान हाती आशेची असु दे
धमनीत क्षमेचे रक़्त महान

असतील गाठीला शिखरे यशांची
मायमातीत रूजून रहा
नात्यांच्या स्पर्शास जाग
राख मायेचा ओलावा!!!

Monday, 13 June 2016

पर्जन्य(मान कमाल आणि किमान)पर्जन्य म्हणण्यापेक्षा पाऊस...एवढा परका वाटू लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. वयाच्या प्रत्येक टप्यावर त्याचं असणं किती निराळं भासत आलय आजवर.....

            बालपणीच्या कोवळ्या वयात तो एका अल्लड सवंगड्यासारखा भेटायचा. ज्याच्या सोबत तासन् तास खेळावे असा. तो आला की आम्हा दोघांची हुंदडायची तयारी व्हायची. मनसोक्त भिजल्यावर कोरडी होऊन जेव्हा मी चादरीत घुसायचे तेव्हा ही दारावर धो धो आपटून मला हाका द्यायचा. अगदी रात्रभर.....


शाळेतला पाऊस म्हणजे नव्या दप्तराची, नव्या वह्या-पुस्तकांची, नव्या छत्रीची….एका नव्या शालेय वर्षाची चाहूल घेऊन येणारा पाऊस. शाळेला दांडी मारून किंवा कधी अनायासे सुट्टी मिळून दिवसभर छान कागदाच्या होड्या बनवयचो आम्ही. आजही पाऊस आला की शालेय जीवनातले अनेक प्रसंग तरंगत राहतात मनात कित्येकदा...


त्यानंतरचा पाऊस गुलाबी...एखाद्या ‍प्रियकरासारखा...चिडवणारा….सतावणारा…..रात्रीच्या एकांत क्षणी सगळे झोपलेले असताना अचानक येऊन भेटणारात्याच्या आगमनाची आस लाऊन बसलेली मी, त्याच्या येण्याने मोहरुन जायचे. मग चहाच्या कपांतून निघणार्‍या वाफांत बर्याच भेटी व्हायच्या आमच्या. धुंदलेले क्षण शहारुन टाकणारे त्याचे येणे आठवले की एका रितेपणाची भावना भरून टाकते मनाला. नव्या नव्या नात्याचे ताजे ताजे स्पर्श जागवणारा तो पाऊस. त्या क्षणाची आठवण प्रखर करणारा.पाऊले नेतील तेथे जायचो आम्ही. संगतीची नशा वाढवणारा पाऊस डोक्यावर घेऊन. काय कमालीचा बरसायचा तो.


आता मात्र किमानच येतो. फक्त येतो नि जातो. ते हुंदडने, मोहरनेशहारने...सगळे सगळे विसरलाय...का बरं रुसलाय कुणास ठाऊक. जलाशयातील पाण्याचा साठा भरून काढण्यास येतो म्हणे....त्याचे येणे आता तेवढ्यापुरतेच राहिले आहे. त्याच्यासाठीही आणि माझ्यासाठीही.....!!!

   

Thursday, 9 June 2016

वादळांतमोडकळीस आलेले मन

आणि हा तुफान वारा
उन्हं रखरखीत फार
नाही राहिला निवारा
गेल्या पावसाळ्यातच
झिरपत होत्या भिंती
सारवले सारे घर
मनवन्या केल्या किती
उभे राहिले खंबीर
एका नव्या आवेगाने
पण क्षणातच सारे  
स्तब्ध केले वादळाने!!!


Saturday, 4 June 2016

क्षितिजे


क्षितिजे विस्तारत गेली
कक्षाही रूंदावल्या
आम्रतरूचा बहर आला
रोपाला इवल्या
सरसर हे दिवस गेले
वार्यावर होऊन स्वार
मूशीतून सोने उपजले
मुकाट खाऊन मार
कधी मधी बघतात 
मागे वळून नजरा
साठवूनी ठेवती मनी
गतकालीन घटना
पुन्हा नव्या उमेदीने
पंखात येऊन बळ
मार्गात उडावया
  क्षितिजे आणखी फार!!!